शहरातील नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी दुपारच्या सुमारास गणेश सिताराम ढगे (रा. महाल पिंपरी) आणि अक्षय खरात (रा. आंबेडकर नगर) यांनी अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून गंगापूर रोडवरील वरुड काजी हद्दीतील एका बंदिस्त इमारतीत नेले. तेथे मुलाला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. तसेच आरोपींनी त्याला जबरदस्तीने मद्य पाजून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर 26 जुलैच्या रात्री आरोपींनी पीडित मुलाला नारेगाव परिसरात सोडून पळ काढल्याचे सांगितले जाते. घरी परतल्यानंतर वेदना असह्य झाल्याने मुलाने संपूर्ण घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर पालकांनी तातडीने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, घटनेपूर्वी आरोपींनी पीडित मुलाला शहरातील केंब्रिज शाळेजवळील एका हॉटेलमध्ये नेले होते. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, त्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. आवाहन : पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रपरिवारावर, त्यांच्या दैनंदिन हालचालींवर आणि ते कोणाच्या संपर्कात आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पालक किंवा पोलिसांना माहिती देण्याबाबत जागरूक करणे गरजेचे आहे.

[[youtube:PivzM6Z0htU]]